Tuesday, August 17, 2010

Saturday, June 27, 2009

मराठी असे आमुची मायबोली


मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे 

जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता थोरवी; 

मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं
पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी 
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं

मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यात ही खंगली
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं

तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्नें नियोजूं तयांना हिच्या मंडणी 
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी
 
गीत-माधव ज्यूलियन